फलटण दि. २१ : श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर (आळंदी - पुणे - पंढरपूर - मोहोळ राष्ट्रीय महामार्ग) सातारा - सोलापूर जिल्हा सरहद्दीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान, नरवीर तानाजीवाडी (पुणे) यांच्यावतीने आज वृक्षांचे रोपण करण्यात आले.
श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग होण्यासाठी वारकरी संप्रदायाची अनेक वर्षांची मागणी होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे वारकऱ्यांच्या स्वप्नातील श्री ज्ञानेश्वर महाराज व श्री तुकाराम महाराज पालखी महामार्ग भव्य-दिव्य झाला आहे. हे महामार्ग तयार करीत असताना या दोन्ही महामार्गांवरील अनेक पुरातन वृक्षांची मोठ्या प्रमाणात तोड झाली असल्याने पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांचा हक्काचा निवारा गेला आहे.
प्रत्येक काम शासनानेच करावे असे गृहीत न धरता आपलीही जबाबदारी म्हणून श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे चोपदार ह.भ.प. रामभाऊ चोपदार यांनी आवाहन केल्यानुसार नरवीर तानाजीवाडी पुणे यांच्यावतीने ह. भ. प. श्रीकांत महाराज पातकर यांच्या मार्गदर्शनाखाली पालखी महामार्गावर ३ वर्षे वयाची कदंब, करंज, कडुलिंब, कपित्थ, आम्र, अश्वत्थ, वड, चिंच, आवळा, गुलमोहर, सीता, अशोक, बकुळ, पळस, औदुंबर, ताम्हण, जंगली सोनचाफा, अर्जुन, जंगली आंबा, जंगली बदाम आदी २० देशी प्रजातीच्या १२० वृक्षांचे जेसीबीने खड्डे घेऊन ६० कुटुंबीयांच्या हस्ते आज (सोमवारी) वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी रामभाऊ चोपदार, श्रीकांत महाराज पातकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सातारा - सोलापूर जिल्हा सरहद्दीवर साधूबुवा ओढ्या नजिक सदर वृक्षारोपण करण्यात आले आहे. या वृक्ष संगोपन व संवर्धनाची जबाबदारी पालखी महामार्ग ठेकेदारांनी उचलली आहे.
२ वर्षांपूर्वी पालखी महामार्गावर वारीच्या दरम्यान निवाऱ्याची सोय करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला, मात्र कायम स्वरुपी निवारा होण्यासाठी झाडे लावणेच गरजेचे आहे, हे ओळखून आपण वृक्षारोपण सुरु केले आहे. हे प्रातिनिधिक स्वरुपात असून वारकरी संप्रदायातील दिंडी, अनेक संस्थांनी पुढे येऊन जास्तीत जास्त वृक्षारोपण दोन्ही पालखी महामार्गावर करणे गरजेचे असल्याचे श्री संत ज्ञानेश्वर महाराज वंशपरंपरागत चोपदार, रामभाऊ चोपदार यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
फोटो : वृक्षारोपण प्रसंगी वृक्षा समवेत वारकरी संप्रदायातील कुटुंबीय मंडळी. दुसऱ्या छायाचित्रात रामभाऊ चोपदार.