नीरा नदीचा 'मृत्यू' होतोय अन् काठचा शेतकरी ढाराढूर झोपलाय! नाशिककरांकडून काही तरी शिका!
फलटण : एकीकडे नाशिकमध्ये कुंभमेळ्यासाठी झाडे तोडणाऱ्या सरकारला तिथल्या जनतेने गुडघे टेकवायला लावले, अगदी साधू-संतांच्या विरोधात जाऊन पर्यावरणासाठी उभे राहण्याचे धाडस दाखवले; पण इकडे नीरा नदीच्या काठी काय सुरू आहे? बारामती आणि फलटणच्या सीमेवरून वाहणारी, हजारो शेतकऱ्यांची जीवनदायिनी असलेली नीरा नदी आज 'विषवाहिनी' झाली आहे. मासे मरून खच पडलेत, पाणी काळवंडले आहे, पण इथला शेतकरी मात्र आपल्याच मृत्यूची वाट पाहत शांत बसला आहे की काय, असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून नीरा नदीच्या पात्रात हजारो मासे मृत अवस्थेत तरंगताना दिसत आहेत. कुजलेल्या माशांमुळे नदीकाठी प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. हे केवळ मासे मरत नसून, हे पाणी पिणाऱ्या प्रत्येकाच्या आरोग्याचा हा 'बळी' घेण्याची नांदी आहे. जर हेच पाणी शेतात गेले तर पिके जळून खाक होत आहेत. उद्या हेच पाणी घराघरांत पोहोचले, तर 'कर्करोगा'सारखे भयावह आजार घराघरांत पाय पसरतील, ही भीती आता वास्तवात उतरताना दिसत आहे.
नदीचे पाणी जोपर्यंत प्रवाहित असते, तोपर्यंत हे पाप वाहून जाते; मात्र पाणी थांबले की कारखानदारांचा 'नालयकपणा' उघड होतो.
या प्रश्नावर इथला भूमिपुत्र मिथुन आटोळे याने आंदोलनाचे हत्यार उपसले, पण दुर्दैवाने इथल्या समाजाने त्याला 'राजकीय' शिक्का मारून वाऱ्यावर सोडले. "जो लढतोय तो राजकीय वाटत असेल, तर तुम्ही स्वतः का उतरत नाही?" असा जळजळीत प्रश्न आता उपस्थित होत आहे. जेव्हा प्रश्न स्वतःच्या भाकरीचा आणि जगण्याचा असतो, तेव्हा राजकारण बाजूला ठेवून एकवटण्याची गरज असते. पण इथला शेतकरी स्वतःच्या भविष्यावर वरवंटा फिरताना शांतपणे पाहत आहे, ही मोठी शोकांतिका आहे.
क्रांतीचा इतिहास असलेल्या या भीमथडीच्या भूमीतील शेतकरी आज इतका हतबल आणि निश्चल का झाला आहे? प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी आणि या कारखानदारांना लगाम घालण्यासाठी आता 'नाशिक पॅटर्न' राबवण्याची वेळ आली आहे. जर आता आपण एकत्र आलो नाही, तर येणारी पिढी आपल्याला कधीच माफ करणार नाही.
वेळ निघून जाण्याआधी जागे व्हा... कारण नदी मेली तर काठचा शेतकरीही जिवंत राहणार नाही!