फलटण (प्रतिनिधी): फलटणच्या राजकारणात आज पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर आहिवळे यांनी आज बुधवार, १७ डिसेंबर रोजी भाजपचा त्याग करत पुन्हा एकदा 'राजे गटात' (शिवसेना) जाहीर प्रवेश केला. विशेष म्हणजे, आहिवळे हे मूळचे राजे गटाचेच कट्टर समर्थक होते, मात्र काही काळापूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता पुन्हा स्वगृही परतल्याने फलटणच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
सुधीर आहिवळे यांचा राजे गटातील हा प्रवेश म्हणजे भाजपसाठी मोठा धक्का आणि 'राजे' शक्तीचे प्रदर्शन मानले जात आहे. राजे गट सोडून गेलेले जुने जाणते नेते आणि कार्यकर्ते आता पुन्हा एकदा सन्मानाने माघारी फिरू लागल्याने, "राजे गटाची मोहिनी" आजही कायम असल्याचे सिद्ध झाले आहे.
राजे गटात सध्या रोज नवनवीन प्रवेशांचा धडाका सुरू आहे. एकामागून एक दिग्गज नेते भाजपला रामराम ठोकत असल्याने विरोधकांचे राजकीय गणित पूर्णपणे बिघडले असून त्यांच्या 'शिट्या गुल' झाल्याची चर्चा चौकाचौकात रंगत आहे. "गेलेले लोक परत येत आहेत, याचाच अर्थ राजे गटाची ताकद आणि कामाची पद्धत विरोधकांना धडकी भरवणारी आहे," अशा प्रतिक्रिया कार्यकर्त्यांमधून उमटत आहेत.
सुधीर आहिवळे यांच्या घरवापसीमुळे भाजपमध्ये गेलेल्या इतर नाराजांचेही डोळे आता राजे गटाकडे लागले आहेत. "ज्यांनी घर सोडलं होतं, त्यांना पुन्हा सन्मान मिळत आहे," हा संदेश गेल्यामुळे आगामी काळात फलटणमध्ये आणखी मोठे राजकीय स्फोट होण्याची शक्यता आहे.
आहिवळे यांच्या या एन्ट्रीमुळे सोशल मीडियावरही कमेंट्सचा पाऊस पडत आहे. 'राजे गट हाच खरा आपला' म्हणत समर्थकांनी जल्लोष केला असून, भाजपच्या स्थानिक गोटात मात्र शांतता पसरली आहे.