डिपॉझिट जप्त करणे तुमच्या सात पिढ्यांना जमणार नाही; राजे समर्थक मैदानात उतरले!
फलटण: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज फलटण येथे महायुतीचे उमेदवार समशेरसिंह नाईक निंबाळकर यांची जाहीर सभा पार पडली. मात्र, या सभेत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केलेल्या विधानांनी नव्या वादाला तोंड फुटले असून, राजे गटाने रणजितसिंहांच्या टीकेचा समाचार घेत त्यांना आरसा दाखवला आहे.
सभेत बोलताना रणजितसिंह म्हणाले की, "विरोधकांचे डिपॉझिट घालवायला थोडीच कसर बाकी आहे." त्यांच्या या विधानावर फलटणमधील राजे समर्थकांनी तत्काळ आक्रमक पवित्रा घेतला. समर्थकांनी स्पष्ट केले की, "ज्यांनी कायम जनतेच्या मनावर राज्य केलं, अशा रामराजे साहेबांच्या विचारांचे डिपॉझिट जप्त करण्याची ताकद आजही कुणात नाही. उलट, स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठी धडपडणाऱ्यांनी आम्हाला हरवण्याची स्वप्ने पाहू नयेत, हे तुम्हाला कधीच जमणार नाही," अशा शब्दांत समर्थकांनी रणजितसिंहांची खिल्ली उडवली.
रामराजे नाईक निंबाळकर यांनी काही काळापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलताना, "शरद पवार यांच्यानंतर महाराष्ट्रातून पंतप्रधानपदासाठी योग्य चेहरा म्हणजे देवेंद्र फडणवीस," असे मोठे विधान केले होते. या विधानामुळे रामराजेंची राजकीय परिपक्वता आणि फडणवीसांशी असलेले त्यांचे सौहार्दपूर्ण संबंध अधोरेखित झाले होते.
नेमकी हीच बाब रणजितसिंह यांना खटकल्याचे आजच्या सभेत दिसून आले. फडणवीसांच्या मनात रामराजेंबद्दल सकारात्मक प्रतिमा तयार होऊ नये, या भीतीपोटी रणजितसिंह म्हणाले की, "रामराजे साहेब तुमचे जाणीवपूर्वक कौतुक करत आहेत." यावरून रणजितसिंह हे रामराजे आणि मुख्यमंत्री यांच्यातील वाढत्या जवळिकीमुळे अस्वस्थ झाले आहेत, हे स्पष्टपणे दिसून येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
थोडक्यात पण महत्त्वाचे:
"एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेले रामराजेंचे स्नेहाचे संबंध आणि दुसरीकडे फलटणच्या जनतेचा पाठिंबा, या दोन्ही आघाड्यांवर रणजितसिंह बॅकफूटवर गेल्याचे चित्र आजच्या सभेतून स्पष्ट झाले आहे."