फलटण:संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या फलटण नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत अखेर भारतीय जनता पक्षाचे समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी बाजी मारली आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत समशेरसिंह यांनी शिवसेनेच्या श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांचा ६०० मतांच्या अल्प फरकाने पराभव केला.
मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच दोन्ही उमेदवारांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. प्रत्येक फेरीगणिक मतांचे अंतर कमी-जास्त होत असल्याने कार्यकर्त्यांचा जीव टांगणीला लागला होता. अखेर समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी १६,४८९ मते मिळवून विजयावर शिक्कामोर्तब केले
या निवडणुकीत ३४१ मतदारांनी 'नोटा'चा पर्याय स्वीकारला. विजयाचे अंतर केवळ ६०० मते असल्याने, नोटाला पडलेली मते आणि अपक्ष किंवा इतर घटकांची भूमिका चर्चेचा विषय ठरत आहे.
हा विजय भाजपसाठी फलटणच्या राजकारणात मोठे बळ देणारा ठरणार आहे. विजयाची घोषणा होताच भाजप कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत आणि फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष साजरा केला. समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या रूपाने फलटणला आता नवा कारभारी मिळाला असून, शहराच्या विकासाची धुरा त्यांच्या खांद्यावर असेल.