'मनोबल'चा मदतीचा हात; तेलंगणाची लेक सासरी परतली! बारामती ते तेलंगणा असा रंगला माणुसकीचा प्रवास
फलटण: रात्रीच्या अंधारात रस्ता चुकलेली, देहभान हरपलेली एक महिला... समोर अंधकारमय भविष्य... पण 'मनोबल आसरा फाउंडेशन'च्या रूपाने तिच्या आयुष्यात प्रकाशाचा किरण आला. बारामती तालुक्यातील लाटे येथे सापडलेल्या एका मनोरुग्ण महिलेला उपचार देऊन, तिच्या स्मृती परत मिळवून देत, तिला चक्क तेलंगणा राज्यातील तिच्या कुटुंबापर्यंत सुखरूप पोहोचवण्याची ऐतिहासिक कामगिरी मनोबल आसरा टीमने केली आहे.
काही महिन्यांपूर्वी, रात्री १० वाजण्याच्या सुमारास बारामती तालुक्यातील लाटे परिसरात एक महिला अत्यंत अगतिक अवस्थेत फिरत होती. मनोबल आसरा टीमचे सदस्य श्री. किशोरकुमार खलाटे यांची नजर या महिलेवर पडली. तिची अवस्था पाहून त्यांनी तातडीने मदतीचा निर्णय घेतला. तिला सुरक्षितपणे वडगाव पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तेथील सर्व कायदेशीर प्रक्रिया (Process) पूर्ण केल्यानंतर तिला पुढील निवारा आणि उपचारासाठी 'मनोबल आसरा फाउंडेशन' मध्ये दाखल करण्यात आले.
ही महिला आपली ओळख सांगण्याच्या स्थितीत नव्हती. मनोबल आसरा फाउंडेशनने तिला तातडीने मेडिकल कॉलेज बारामती येथे उपचारासाठी दाखल केले. सलग तीन महिने तिच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. फाउंडेशनच्या सदस्यांनी तिची प्रेमाने सेवा केली. या मायेच्या ओलाव्यामुळे आणि योग्य उपचारामुळे तिने चांगला प्रतिसाद दिला. हळूहळू तिला भूतकाळ आठवू लागला आणि तिने आपल्या कुटुंबाची माहिती दिली.
तिने दिलेल्या माहितीनुसार, तिचे नाव गोदावरी असून पतीचे नाव गोविंद बागडे (रा. मोळा, जिल्हा आदिलाबाद, तेलंगणा) असल्याचे समोर आले. ही माहिती मिळताच मनोबल आसरा फाउंडेशनने शोधमोहीम तीव्र केली आणि तिची ओळख पटवण्यात यश मिळवले.
या महिलेला तिच्या घरी पोहोचवण्यासाठी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पी.आय. जगताप साहेब, ए.पी.आय. पवार साहेब, ठाणे अंमलदार सौ. भोसले ताई, आणि महिला पोलीस सौ. सविता आगम यांनी मोलाचे सहकार्य केले. या कार्यात सौ. शैला बागडे, श्री. हनुमंत खलाटे आणि श्री. राजू पाटील यांनीही विशेष परिश्रम घेतले.
सर्व तांत्रिक बाबी पूर्ण केल्यानंतर, गोदावरीला तिचे पती श्री. गोविंद बागडे आणि पुतण्या श्री. मारुती बागडे यांच्या ताब्यात देण्यात आले. अनेक दिवसांच्या विरहानंतर आपल्या कुटुंबाला भेटल्यावर गोदावरीच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. तेलंगणातून आलेल्या तिच्या पतीने मनोबल आसरा फाउंडेशन आणि महाराष्ट्र पोलिसांचे हात जोडून आभार मानले.