पाडेगाव फार्म, ताम्हाणे वस्ती येथे धक्कादायक घटना; एकावर गुन्हा दाखल
फलटण/लोणंद (प्रतिनिधी):
फलटण तालुक्यातील पाडेगाव फार्म येथील ताम्हाणे वस्ती येथे शेतजमिनीच्या बांधावरून सुरू असलेल्या सततच्या आणि असह्य मानसिक छळामुळे त्रस्त झालेल्या एका ६० वर्षीय शेतकऱ्याने विषारी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
याप्रकरणी लोणंद पोलीस ठाण्यात सोमनाथ ज्ञानदेव ताम्हाणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत काशिनाथ साधू ताम्हाणे (वय ६०) यांना सोमनाथ ज्ञानदेव ताम्हाणे यांनी गेल्या पाच ते सहा वर्षांपासून सतत त्रास देणे सुरू ठेवले होते. आरोपी सोमनाथ ताम्हाणे हा वारंवार काशिनाथ ताम्हाणे यांच्या वडिलांच्या शेतातील बांध फोडणे, पाणी घालणे आणि सातत्याने मानसिक छळ करणे असे प्रकार करत होता.
या सततच्या त्रासाला कंटाळून काशिनाथ ताम्हाणे यांनी अखेरीस जीव देण्याचा निर्णय घेतला.
काशिनाथ ताम्हाणे यांनी ३० नोव्हेंबर रोजी दुपारी २.४० च्या सुमारास कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. घटनेनंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरु असतानाच दिनांक ६ डिसेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला.
या दुर्दैवी घटनेनंतर कीर्ती सागर राऊत (वय ३५) यांनी लोणंद पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी घटनेची नोंद ६ डिसेंबर रोजी रात्री ९.२५ वाजता केली असून, आरोपी सोमनाथ ज्ञानदेव ताम्हाणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनी) भोसले यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक (पोउपनि) हेगडे करत आहेत.