सातारा जिल्ह्यात गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची विक्री व वाहतुकीवर कारवाई; फलटणमधील अवैध विक्रीवर कारवाईची मागणी!
सातारा दि. २७ (वृत्त प्रतिनिधी) - आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई, डॉ. राजेश देशमुख सो., मा. सहआयुक्त, (अ. व द.) प्रसाद सुर्वे सो., मा. विभागीय उपायुक्त, कोल्हापूर विभाग कोल्हापूर, विजय चिंचाळकर सो. तसेच अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सातारा बाबासाहेब भुतकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक, सातारा या कार्यालयाने मौ. करंजे, ता. जावली, जि. सातारा येथे सापळा रचून दि. २६ नोव्हेंबर २०२५ रोजी मोठी कारवाई केली आहे.
गोवा बनावटीच्या परराज्यातील अवैद्य मद्याची विक्री आणि वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना जेरबंद करण्यात आले असून त्यांच्याकडून ₹२,५४,०६०/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईत गणेश विष्णूदास धनावडे (वय २८, रा. करंजे, ता. जावळी) यास गोवा बनावटीचे परराज्यातील अवैद्य मद्य, देशी व विदेशी मद्यासह ताब्यात घेतले. तसेच, त्यास अवैद्य मद्य पुरवठा करणारा आरोपी अतुल ज्ञानदेव धनावडे (वय २९, रा. बिरवडी, ता. महाड, जि. रायगड) याच्या ताब्यातूनही अवैध मद्य पुरवठा करण्यासाठी वापरण्यात आलेले दुचाकी वाहन जप्त करण्यात आले.
वरील दोन्ही आरोपींकडून गोवा बनावटीचे विदेशी मद्य, महाराष्ट्र राज्यातील विदेशी मद्य आणि देशी मद्यासह दोन दुचाकी वाहने असा एकूण ₹२,५४,०६०/- (दोन लाख चोपन्न हजार साठ रुपये) किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाईमध्ये निरीक्षक माधव चव्हाण, दुय्यम निरीक्षक अजयकुमार पाटील व विजय मरोड आणि जवान, मनिष माने, सागर आवळे, अजित रसाळ यांनी सहभाग घेतला. गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक अजयकुमार पाटील हे करीत आहेत.
एकीकडे संपूर्ण सातारा जिल्ह्यात भरारी पथक आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाची अवैध मद्यविक्री आणि वाहतुकीवर चांगली कामगिरी सुरू आहे, तर दुसरीकडे फलटण तालुक्याबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, फलटणमध्ये खुलेआम दारू आणि गुटख्याची विक्री सुरू आहे, परंतु या ठिकाणी प्रशासनाकडून कोणतीही प्रभावी कारवाई होताना दिसत नाही. 'संपूर्ण सातारा जिल्ह्यात प्रशासनाची चांगली कामगिरी होत असताना फलटण तालुक्याकडे दुर्लक्ष का?' असा थेट सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या काळात अवैध मद्य आणि गुटख्याच्या विक्रीतून गैरव्यवहार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे, सातारा जिल्ह्याचे प्रशासनाने तातडीने फलटणमध्येही कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
सातारा जिल्ह्यातील बेकायदा परराज्यातील मद्य, अवैद्य हातभट्टी मद्य निर्मिती व विक्री, ताडी निर्मिती व विक्री तसेच देशी, विदेशी मद्याची विक्री आणि वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या टोल फ्री क्रमांकावर किंवा व्हॉट्सॲपवर संपर्क साधावा, असे आवाहन अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सातारा बाबासाहेब भुतकर यांनी केले आहे:
सूचना: तक्रारदाराचे नाव व संपूर्ण माहिती गोपनीय ठेवण्यात येईल.