फलटण: फलटण-लोणंद रस्त्यावर कापडगाव (ता. फलटण) हद्दीत आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला असून, अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
या अपघातात रामजतन इंद्रकुमार गौड (वय २३, रा. मॅग्नेशिया कंपनी, लोणंद) हे जागीच ठार झाले आहेत. तर, रामसागर आनंदकुमार गौड आणि रवीकुमार गौड (दोघेही रा. सोनभद्र, उत्तर प्रदेश) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नेमके काय घडले?
लोणंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणंद-फलटण रस्त्यावरून फलटणच्या दिशेने भरधाव वेगात निघालेल्या (एमएच- १० सीक्यू- २४२६) या टेंपोने सकाळी साडेआठच्या सुमारास कापडगाव हद्दीत समोरून येणाऱ्या (एमएच- ४५ क्यू -६९०३) या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की, दुचाकीस्वार रामजतन गौड यांचा जागीच मृत्यू झाला.
टेंपोचालक फरार
अपघात घडल्यानंतर जखमींना कोणतीही मदत न करता टेंपोचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच लोणंद पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. सहाय्यक पोलिस निरीक्षक सुशील भोसले आणि हवालदार अतुल कुंभार यांनी घटनास्थळी पंचनामा केला.
फरार टेंपोचालकाविरुद्ध लोणंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.