सीसीटीव्ही फुटेजमुळे चोरटा जाळ्यात, एकास अटक.
फलटण: फलटण नगरपालिकेच्या वाहनतळामधून अवघ्या काही तासांपूर्वी चोरीस गेलेली एक दुचाकी फलटण शहर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत जप्त केली आहे. याप्रकरणी एका दुचाकी चोरास अटक करण्यात आली असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. शहर पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (ता. १६) सायंकाळी चार ते रात्री १० वाजण्याच्या सुमारास फलटण नगरपालिकेच्या वाहनतळावरून एक दुचाकी चोरीला गेली होती. या घटनेची तक्रार फलटण शहर पोलीस ठाण्यात दाखल होताच, गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला.
पोलिस निरीक्षक अरविंद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी काकासाहेब कर्णे आणि अतुल बडे यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली.
तत्काळ त्याला अटक करून त्याच्याकडून चोरीस गेलेली दुचाकी जप्त करण्यात आली. पोलिसांनी केवळ २४ तासांच्या आत चोरीचा छडा लावून चोरीची घटना उघडकीस आणली आहे.
या यशस्वी कारवाईत पोलिस उपअधीक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अरविंद काळे, गुन्हे शोध पथकचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन शिंदे, पोलिस कर्मचारी काकासाहेब कर्णे आणि अतुल बडे यांनी सहभाग घेतला.