फलटण: तडीपारी आदेशाचा भंग करून हद्दपार क्षेत्रात प्रवेश केल्याप्रकरणी एका आरोपीविरुद्ध फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हद्दपार प्राधिकरणाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मनोज राजेंद्र हिप्परकर (रा. महतपुरापेठ, फलटण, ता. फलटण, जि. सातारा) याला मा. हद्दपार प्राधीकरण तथा पोलीस अधीक्षक, सातारा यांच्या आदेशानुसार दोन वर्षांसाठी संपूर्ण सातारा जिल्हा आणि सातारा जिल्ह्यातील पुणे जिल्ह्यातील बारामती व पुरंदर तालुके तसेच सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुका या हद्दीतून तडीपार करण्यात आले होते. हा आदेश २३/०६/२०२५ रोजी जारी करण्यात आला होता.
या आदेशाचा भंग करून मनोज हिप्परकर हा कोणत्याही प्रकारची रीतसर परवानगी न घेता तडीपारी क्षेत्रातील महतपुरापेठ, फलटण येथील राहत्या घरी मिळून आला
दिनांक १४/११/२०२५ रोजी सकाळी ११.२५ वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अतुल सतीश बडे (ब.नं. ८८६, नेमणूक - फलटण शहर पोलीस ठाणे) यांनी सरकारतर्फे कायदेशीर फिर्याद दिली आहे.
त्यानुसार, आरोपी मनोज हिप्परकर याच्या विरोधात महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२ अन्वये फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास म.पो.हवा. ७७३ राणी फाळके, फलटण शहर पोलीस ठाणे करत आहेत.