सरकारी कामात अडथळा, धक्काबुक्की-शिवीगाळ
फलटण: थकबाकीदार वीज बिलाची वसुली करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना फलटण शहरात मारहाण केल्याची व सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. 'आखरीज रस्ता, मंगळवार पेठ' परिसरात हा प्रकार घडला असून, या प्रकरणी महावितरणच्या चार कर्मचाऱ्यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ऋषिकेश गंगाराम सोनवणे (विद्युत सहाय्यक) यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिनांक १२ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी सोनवणे आणि त्यांच्यासोबतचे आर्यन काकडे, दिव्या डोईजडकर, तेजपाल भिसे, निलेश कणसे हे कर्मचारी गणवेशात आणि ओळखपत्र घालून मंगळवार पेठ येथील थकीत ग्राहक मिनाज मजीर वेपारी यांच्याकडे वीजबिल वसुलीसाठी गेले होते.
मिनाज वेपारी यांचे वीज कनेक्शन बंद केल्यानंतर, शेजारी राहणारे गणेश सुभाष इंगळे यांचेही थकबाकीमुळे कनेक्शन कट करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी आर्यन काकडे हे घरावर चढले.
याच वेळी, आधी कनेक्शन कट केलेले मिनाज वेपारी यांनी त्यांचे दोन मुलगे अफान मजीर वेपारी आणि अफताब मजीद वेपारी यांना बोलावून घेतले. त्यांनी येऊन कर्मचारी सोनवणे, डोईजडकर, भिसे आणि कणसे यांना धक्काबुक्की करत शिवीगाळ केली.
परिस्थिती चिघळत असतानाच रमेश इंगळे आणि प्रेम इंगळे (प्रिन्स) हे दोघेही तेथे आले. त्यांनी आपले वीज कनेक्शन कट करू नये यासाठी थेट गोंधळ घालण्यास सुरुवात केली. घरावर कनेक्शन कट करण्यासाठी गेलेल्या आर्यन काकडे यांना या जमावाने दगडांनी आणि विटांच्या तुकड्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.
मारहाण सुरू असताना आर्यन काकडे आपल्या मोबाईलमध्ये घटनेचा व्हिडिओ काढत असल्याचे पाहून रमेश इंगळे यांनी त्यांच्याशी थेट धक्काबुक्की केली आणि सरकारी कामात अडथळा निर्माण केला.या प्रकारानंतर फिर्यादी ऋषिकेश सोनवणे यांनी तातडीने फलटण शहर शाखा क्रमांक १ चे सहाय्यक अभियंता दिनेश जोनवाल यांना फोन करून माहिती दिली. जोनवाल यांनी घटनास्थळी धाव घेऊन जमावाला समजावून सांगितले. त्यानंतर फिर्यादींनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या घटनेप्रकरणी पोलिसांनी १) अफान मजीर वेपारी २) अफताब मजीद वेपारी ३) रमेश इंगळे (पूर्ण नाव माहित नाही) आणि ४) प्रेम इंगळे (प्रिन्स) (पूर्ण नाव माहित नाही) यांच्या विरोधात धक्काबुक्की, शिवीगाळ, दमदाटी आणि सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. फलटण शहर पोलीस या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत.