पुणे (प्रतिनिधि) स्वराज्य निष्ठावंत श्रीमंत राजे पिलाजीराव राजे शिर्के यांच्या धाकल्या राजकन्या राजाऊ.. स्वराज्यनिष्ठ श्रीमंत राजे गणोजीराव राजे शिर्के यांच्या लाडक्या बहिणाबाई युवराज्ञी जिऊ.. राष्ट्रमाता माँ जिजाऊंच्या नातसुन ..शिवछत्रपतींच्या स्नुषा स्वराज्याच्या कुलमुखत्यार.. छत्रपती संभाजीराजांच्या श्री सखी राज्ञी जयति महाराणी येसुबाई साहेब..अर्थात छत्रपती थोरल्या शाहूराजांच्या राजमाता माँ राजाऊ साहेबांचे २१ डिसेंबर १७३० ला निधन झाल्याने त्यांच्या २९५ व्या "स्मृतिदिनाच्या" निमित्ताने येणाऱ्या दि. २१ डिसेंबर २०२५ रोजी सर्वत्र स्मरण व्हावे असे आवाहन पत्रकार, इतिहास अभ्यासक व महाराणी येसुबाईंचे ( श्रीमंत राजेशिर्के घराण्याचे ) वंशज लक्ष्मीकांत राजे शिर्के यांनी केले आहे.
आता इथूनपुढे दरवर्षी २१ डिसेंबर रोजी "स्मृतिदिन" तसेच २७ जुलै रोजी "जयंती " आयोजित करण्याचे समाजमान्य झाले असून सर्वत्र होत असल्याने स्वराज्य रक्षिका छत्रपती महाराणी येसूबाईंच्या कर्तुत्ववाचा, त्यागाचा दुर्लक्षित वास्तव इतिहास जगाला माहित होऊन समाजाला आदर्शवत ठरण्यास मदत होणार आहे. परंतु दुर्दैवाने इथून मागे हे आजपर्यंत शक्य झाले नव्हते. कारण कोणत्याही जुन्या नव्या ऐतिहासिक कथा, कादंबऱ्या,बखरी अथवा पुस्तकांमध्ये येसूबाईंच्या जन्म तसेच मृत्यूची नोंद सापडत नाही. आणि ही नोंद सापडत नसल्याची सल सर्वांच्या मनाला दुःख देऊन जाते. याबाबत महाराणी येसुबाई तथा श्रीमंत राजेशिर्के घराण्याचे वंशज लक्ष्मीकांत गणपतराव राजे शिर्के यांनी अनेक विचारवंत लेखक, ज्येष्ठ इतिहास तज्ञ, इतिहास अभ्यासकांशी सविस्तर चर्चा केली असता त्यांच्याही बोलण्यातून असे आल्याचे समजते की, महाराणी येसूबाईंच्या जीवनातील जन्म, मृत्यू सह अनेक महत्वाच्या घटनांच्या तिथी अथवा तारखा अजूनही सापडल्या नाहीत, जेव्हा सापडतील तेव्हाच जयंती व स्मृतिदिन कार्यक्रम करावे लागतील असे उत्तर मिळत आहे.
परंतु या आधुनिक वेगवान प्रगत जगात अशा तोटक्या उत्तराने समस्त शिव-शंभुभक्तांचे समाधान होत नाही. म्हणून संंबधित विषयावर गांभीर्याने विचार करून जयंती, स्मृतिदिनाच्या तारखा निश्चित करणे गरजेचे असल्याने आता थांबून चालणार नाही, आजपर्यंत इतिहासात माती आणि लेखनात काड्या करणाऱ्या काही कट- कारस्थानी लेखक, बखरकार, लोकांचे मनसुबे हाणून पाडले पाहिजेत. काही बुद्धिभ्रष्ट लेखकांसह स्वयंघोषित इतिहास अभ्यासक मंडळींनी आजपर्यंत जन्म मृत्यूची म्हणजे जयंती व स्मृतिदिनाची तारीख शोधली नाही आणि शोधण्याची तस्दी ही घेतली नाही परंतु त्यांनी येसुबाईंचे आवर्जुन अटक दिन, सुटका दिनाच्या तारखा शोधून पुस्तकात लिहिल्या आणि त्या वेदनादायी वाईट दिवसांचे स्मरण करताना ही प्रवृत्ती दिसत आहे. यात अन्य समाजाला ही गुंतवू पहात आहेत. अशाप्रकारे वास्तव, खरा इतिहास लपवु पाहणाऱ्या लोकांच्या विचारांना बळी न पड़ता आता तरी येसुबाईंची जयंती व स्मृतिदिन आयोजित करण्यासाठी इतिहासप्रेमी व शिव-शंभु भक्तांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
ज्याप्रमाणे छत्रपती राजाराम महाराजांच्या महाराणी ताराराणी यांच्या मृत्यूचा कुठेच उल्लेख सापडत नसल्याने त्यांच्या माहेर कडील सर्व हंबीरराव व मोहिते घराण्याच्या वंशजांनी एकत्र येऊन, महाराणी ताराराणी यांच्या पुण्यदिनाची (स्मृतिदिन) एक तारीख ठरवली. अगदी त्याप्रमाणेच आता ऐतिहासिक श्रीमंत राजेशिर्के तथा येसुबाईंच्या माहेर कडील थेट वंशज घराणे तसेच राज्यातील अन्य समस्त शिर्के घराण्यातील मान्यवरांसह तमाम शिव-शंभुभक्तांना विचारात घेऊन सर्वांनी एकत्र येऊन महाराणी येसुबाईंच्या जयंतीची तारीख व स्मृतिदिनाची तारीख जाहीर केली आहे. आता अवघ्या राज्यभर येसुबाई जयंती सोहळा व स्मृतिदिन कार्यक्रम झाले पाहिजेत, विशेष करून येसुबाईंच्या मूळ जन्मगावी म्हणजेच कोकणातील "शृंगारपुर" येथील किल्ले प्रचितगड या राजेशिर्के यांच्या राजधानीच्या ठिकाणी (जयंती उत्सव ) भव्य जन्मोत्सव तर सातारा जवळील असणाऱ्या संगम माहुली येथील समाधी स्थळी स्मृतिदीन (पुण्यदिन) आयोजित करून महाराणी येसुबाईंचे (शाहूमाता राजाऊंचे ) स्मरण केले पाहिजे.
पत्रकार, इतिहास अभ्यासक व वंशज लक्ष्मीकांत राजे शिर्के यांनी वंशज यानात्याने सर्व जेष्ठ लेखक, इतिहास अभ्यासक, पत्रकार , शिर्के मंडळी, शिव-शंभुभक्त यांच्याशी सविस्तर चर्चा केली असून सर्वांच्या सकारात्मक प्रतिक्रिया आल्या आहेत. त्यानुसार वंशज लक्ष्मीकांत राजेशिर्के यांच्या घरामध्ये बरेच वर्षांपासून महाराणी येसुबाई साहेबांची जयंती २७ जुलै रोजी व स्मृतिदिन २१ डिसेंबर रोजी घरगुती पद्धतीने आयोजन करत आहेत. त्याप्रमाणे इथून पुढेही याच तारीख आता समाजाने मान्य केल्या असून सर्वत्र जाहिर होताना दिसत आहेत. घरात होणारी जयंती व स्मृतिदिन सार्वजनिक स्वरूपात होणार आहे तरी या पवित्र कार्यात सर्वांनी सहभाग घेत आपल्या घरात, दारात, कार्यालयात, वार्डात , वाडीवर, वस्तीवर, गावात, शहरात, तालुक्यात, जिल्ह्यात , राज्यभर, देशभर, जगभर श्रींची इच्छा समजून (येसुबाई जयंती २७ जुलै रोजी ) तसेच (येसुबाई स्मृतिदिन २१ डिसेंबर रोजी) आयोजित करावेत, येसुबाईंचे छायाचित्र ही अधिकृत केले असून लवकरच शालेय स्तरावर जयंती साजरी होण्याकामी आपण राज्य सरकारकडे मागणी करणार असल्याचे वंशज लक्ष्मीकांत राजे शिर्के यांनी प्रसिद्धि पत्रकात म्हंटले आहे.
महाराणी येसुबाईंचा फोटो वंशज घराण्यांनी अधिकृत केलेला व समाजमान्य झालेलाच फोटो वापरावा, सोबत फोटो जोडत आहे. जयंती व स्मृतिदिनाची तारीख निश्चित करणेकामी राजेशिर्के वंशज घराणे, शिर्के घराणे कोअर कमिटी, शंभुसेना संघटना, स्वराज्यनिष्ठ श्रीमंत पिलाजीराजे शिर्के प्रतिष्ठाण, शंभुसेना प्रणित राजाऊ रेजिमेंट संघटना, स्वराज्यनिष्ठ श्रीमंत गणोजीराजे शिर्के स्मृती समिती, महाराणी श्रीमंत येसुबाई साहेब सेवा फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य गडदुर्ग संवर्धन ट्रस्ट, ऐतिहासिक वंशज घराणे संघटन, राजेशिर्के घराणे संघटन, इतिहास अभ्यासक, लेखक, इतिहास समिती, आदींचे मार्गदर्शन लाभले असल्याची माहिती लक्ष्मीकांत राजे शिर्के यांनी दिली.