फलटण: एखादी व्यक्ती हरवली की तिचे कुटुंब आशा सोडून देते, पण नशिबाचे चक्र आणि माणुसकीची जोड मिळाली की अशक्य गोष्टीही शक्य होतात. तेलंगणा राज्यातील आदिलाबाद येथून बेपत्ता झालेली मनोरुग्ण महिला, गोदावरी बागडे, तब्बल तीन महिन्यांच्या उपचारानंतर आणि पाठपुराव्यानंतर सुखरूप आपल्या पतीच्या कुशीत परतली आहे. 'मनोबल आसरा फाउंडेशन' आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हा 'हॅप्पी एंड' पाहायला मिळाला.
काही महिन्यांपूर्वी रात्री १० वाजताच्या सुमारास, बारामती तालुक्यातील लाटे परिसरात एक मनोरुग्ण, बेवारस महिला अत्यंत दयनीय अवस्थेत फिरत असताना मनोबल आसरा टीमचे सदस्य श्री. किशोरकुमार खलाटे यांच्या निदर्शनास आली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी तातडीने तिला वडगाव पोलीस ठाण्यात नेले. तेथील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तिला उपचारासाठी 'मनोबल आसरा फाउंडेशन' मध्ये दाखल करण्यात आले.
ती महिला मानसिक आजारामुळे स्वतःची ओळख सांगू शकत नव्हती. फाउंडेशनने तिला मेडिकल कॉलेज, बारामती येथे दाखल केले. तब्बल तीन महिने तिच्यावर सातत्याने उपचार करण्यात आले. या उपचारांना तिने सकारात्मक प्रतिसाद दिला आणि हळूहळू तिला आपली ओळख आठवू लागली. तिने आपले नाव गोदावरी असून पतीचे नाव गोविंद बागडे (रा. मोळा, जि. आदिलाबाद, तेलंगणा) असल्याचे सांगितले.
मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यासाठी मनोबल फाउंडेशनने पोलीस प्रशासनाची मदत घेतली. फलटण ग्रामीणचे पी.आय. जगताप साहेब, ए.पी.आय. पवार साहेब, ठाणे अंमलदार सौ. भोसले ताई, पोलीस कर्मचारी सौ. सविता आगम, सौ. शैला बागडे, तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री. हनुमंत खलाटे आणि श्री. राजू पाटील यांच्या विशेष सहकार्याने तेलंगणातील कुटुंबाचा शोध घेण्यात यश आले.
काल अधिकृतरीत्या गोदावरीला तिचे पती श्री. गोविंद बागडे आणि पुतण्या श्री. मारुती बागडे यांच्या स्वाधीन करण्यात आले. आपल्या पत्नीला सुखरूप पाहून पतीच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.
"रस्त्यावर पडलेल्या निराधार व्यक्तीला आधार देऊन, तिला उपचार मिळवून देऊन तिच्या हक्काच्या घरापर्यंत पोहोचवणे हेच आमच्या फाउंडेशनचे मुख्य ध्येय आहे. या कार्यात पोलिसांचे सहकार्य मोलाचे ठरले." > — मनोबल आसरा फाउंडेशन
या कार्याबद्दल संपूर्ण बारामती आणि फलटण परिसरात किशोरकुमार खलाटे आणि मनोबल आसरा फाउंडेशनचे कौतुक होत आहे.