सामंजस्य करारावेळी उपस्थित डॉ. बालसुब्रमण्यम के., श्री. अरविंद निकम प्राचार्य डॉ मनोजकुमार दळवी व इतर
फलटण एज्युकेशन सोसायटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाने आपल्या शैक्षणिक आणि संशोधन प्रवासात एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. महाविद्यालयाचा 'संशोधन आणि बौद्धिक संपदा हक्क कक्ष आणि संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी पुण्याची नामांकित संस्था 'डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अडव्हान्स टेक्नॉलॉजी' (DIAT) यांच्यात नुकताच सामंजस्य करार (MoU) करण्यात आला.
या कराराचा मुख्य उद्देश विद्यार्थी आणि प्राध्यापकांमध्ये संशोधन संस्कृती, नवनिर्मिती आणि बौद्धिक संपदा निर्मितीला चालना देणे हा आहे. हा करार २८ नोव्हेंबर २०२५ पासून लागू झाला असून तो पुढील तीन वर्षांसाठी वैध असणार आहे.
या करारामुळे फलटण अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना आता DIAT च्या प्रयोगशाळांमध्ये इंटर्नशिप, मिनी-प्रोजेक्ट्स आणि अल्पमुदतीचे प्रशिक्षण घेण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. दोन्ही संस्थांचे प्राध्यापक एकमेकांच्या कॅम्पसमध्ये जाऊन व्याख्याने आणि कार्यशाळा घेऊ शकतील, ज्यामुळे ज्ञानाची देवाणघेवाण होईल.
दोन्ही संस्था मिळून संयुक्त संशोधन प्रकल्प आणि प्रकाशनांवर काम करतील. पेटंट ड्राफ्टिंग, फाइलिंग आणि आयपीआर (IPR) जनजागृती कार्यक्रमांसाठी DIAT कडून तांत्रिक मार्गदर्शन आणि सहकार्य मिळेल. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील फंडिंग एजन्सींकडे संयुक्त प्रस्ताव सादर करण्यासाठी दोन्ही संस्था सहकार्य करतील.
या करारावर फलटण अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोजकुमार व्ही. दळवी आणि DIAT चे डीन (अकॅडेमिक्स) वरिष्ठ प्रा. डॉ. बालसुब्रमण्यम कंडासुब्रमण्यम यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
हा करार केवळ कागदोपत्री नसून दोन्ही संस्थांमधील संसाधने आणि तज्ज्ञांच्या देवाणघेवाणीचा एक आराखडा आहे, ज्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रगत संरक्षण तंत्रज्ञानाशी जोडले जाणे शक्य होईल असे प्रतिपादन फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम यांनी केले. या कराराबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी महाविद्यालय प्रशासनाचे अभिनंदन केले.