फलटण दि. ३१ : संपूर्ण सातारा जिल्ह्यात किंबहुना महाराष्ट्रात अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले असून फलटण तालुक्यात ते सर्वाधिक आहे, नुकसानीचे पंचनामे ८० टक्के पूर्ण झाले असून उर्वरित २० टक्के पंचनामे पूर्ण होताच राज्य शासन बाधितांना योग्य प्रकारे मदत तातडीने करणार असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील यांनी आवर्जून सांगितले.फलटण शहर व तालुक्यात दि. २४, २५ व २६ मे रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी, बाधीत कुटुंबे आणि लोकप्रतिनिधी यांना भेटून माहिती घेण्यासाठी, बाधितांना दिलासा देण्यासाठी आज (शनिवारी) ना. मकरंद पाटील यांनी फलटण तालुक्याचा दौरा केला. यावेळी प्रांताधिकारी सौ. प्रियंका आंबेकर, तहसीलदार डॉ. अभिजित जाधव, निवासी नायब तहसीलदार अभिजित सोनवणे, मुख्याधिकारी निखिल मोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस, पोलिस निरीक्षक हेमंतकुमार शहा, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, तालुकाध्यक्ष व जिल्हा बँकेचे संचालक श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर, आ. सचिन पाटील, महानंदचे माजी व्हा. चेअरमन डी. के. पवार, शिवसेना तालुकाध्यक्ष नानासाहेब तथा पिंटू इवरे, विक्रमसिंह भोसले, पै. बजरंग गावडे, भाजप तालुकाध्यक्ष बापूराव शिंदे, रामभाऊ ढेकळे यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते. राज्यात कमी अधिक प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने विविध बैठका, प्रशासनाला सूचना देणे वगैरेमुळे आपल्याला फलटणला यायला उशीर झाला असला तरी आपण माहिती घेत होतो, फलटण तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाल्याने नुकसानही सर्वाधिक झाले आहे, अतिवृष्टी नुकसान भरपाईचे निकष पाहता जेथे २४ तासात ६५ मि.मी. पेक्षा अधिक पाऊस झाला तेथे अतिवृष्टी झाली असे मानण्यात येते, येथे १६५ मि. मी. पाऊस झाला आहे, फलटण तालुक्याची पावसाची वार्षिक सरासरी ३२५ मि.मी. इतकी अत्यल्प असून येथे ३ दिवसात ३६५ मि.मी. म्हणजे अति पाऊस झाल्याने या तालुक्याला प्राधान्याने आणि तातडीने शासन मदत करेल असा विश्वास ना. मकरंद पाटील यांनी व्यक्त केला.फलटण तालुक्यात शेत जमीन, पिके, फळबागा, जनावरे, ठिबक व तुषार सिंचन संच, वीज मोटारी, विहिरी, राहती घरे, जनावरांचे गोठे, शासकीय इमारती विशेषत: प्रा. शाळा, अंगणवाडी इमारती, रस्ते, पूल वगैरेंचे मोठे नुकसान झाले असल्याची माहिती मिळताच आपण येथे आलो नसलो तरी विभागीय आयुक्तांना तातडीने बाधितांना योग्य ती मदत करण्याचे व नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्याचे ना. मकरंद पाटील यांनी आवर्जून सांगितले.खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना व घरे वाहुन गेलेल्या पूर बाधीत कुटुंबांना तातडीने मदत करण्याबाबत विचारणा केली असता बाधित कुटुंबांना अन्नधान्य व तात्पुरता निवारा उपलब्ध करुन दिला असून शेतकऱ्यांना पंचनामे पूर्ण होताच एन डी आर एफ च्या निकषानुसार जास्तीत जास्त मदत तातडीने देण्याचा शासनाचा प्रयत्न असून त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही असल्याने ती मदत लवकर देण्याचा आपला प्रयत्न असल्याचे ना. मकरंद पाटील यांनी स्पष्ट केले.चौकट : शासन, प्रशासन अशा प्रसंगात नियम निकष सांगू लागल्यावर पूर्वी स्व. लक्ष्मणराव पाटील, स्व. चिमणराव कदम, स्व. विलासराव पाटील शासन प्रशासनाला धारेवर धरुन लोकांना प्राधान्याने मदत करण्यास आग्रही असत ती भूमिका आपण घेणार का ? असा सवाल करताच पूर्वी मदत कमी आणि वेळेवर मिळण्यात अडचणी असत आता शासन गतिमान आणि लोकहिताला प्राधान्य देणारे असल्याने तसा प्रसंग येणार नसल्याचे ना. मकरंद पाटील यांनी स्पष्ट केले
.