फलटण: आगामी होऊ घातलेल्या फलटण नगर परिषद निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर राष्ट्रीय काँग्रेसने घेतलेल्या आक्षेपाबाबत निवडणूक शाखेकडून अद्याप कोणतेही उत्तर मिळालेले नाही. तसेच, सदोष मतदार यादीवर मोठ्या प्रमाणात हरकती दाखल झाल्या असून यामुळे काही प्रभागांतील मतदार संख्येत वाढ किंवा घट होण्याची शक्यता आहे. मतदार संख्या निश्चित न होताच जाहीर झालेल्या आरक्षणावर याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त करत, फलटण तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष श्री. महेंद्र सूर्यवंशी (बेडके) आणि शहर काँग्रेसचे अध्यक्ष श्री. पंकज पवार यांनी मुख्याधिकारी श्री. निखिल जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे की, नगर परिषद निवडणुकीसाठीची मतदारयादी अंतिम झाल्यानंतरच पुन्हा आरक्षण सोडत घेण्यात यावी.
निवेदनात नमूद केल्यानुसार, मतदार यादीतील बदलांमुळे काही प्रवर्गातील मतदारसंख्येत बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे सध्या जाहीर झालेले आरक्षण योग्य ठरणार नाही आणि निवडणुकीच्या प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे, अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यावरच नव्याने आरक्षण सोडत काढणे आवश्यक आहे, असे काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
यावेळी जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस श्री. गंगाराम रणदिवे तसेच काँग्रेसचे पदाधिकारी श्री. धनंजय गोरे आणि श्री. सुधीर शिंदे हे देखील उपस्थित होते
.