फलटण रणसंग्राम: मतदानावेळीच मोठा हायव्होल्टेज ड्रामा! ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड, मतदार आणि उमेदवारांचा संताप
फलटण: फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीत आज राजकीय धुराळा उडत असतानाच, प्रभाग क्रमांक १३ मध्ये ईव्हीएम (EVM) मशीनच्या बिघाडामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला. नगराध्यक्षपदासाठी 'काटे की टक्कर' सुरू असतानाच मतदान यंत्राचे बटन दबत नसल्याने मतदारांचा संयम सुटला आणि मतदान केंद्रावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळची फलटणची निवडणूक संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेत आहे. नगराध्यक्षपदासाठी नाईक-निंबाळकर घराण्यातीलच दोन दिग्गज आमनेसामने आहेत:
या 'रॉयल' लढतीमुळे सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साह होता, मात्र तांत्रिक अडचणीने या उत्साहावर विरजण घातले.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाग क्र. १३ मधील एका मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनचे बटन दाबले जात नसल्याच्या तक्रारी मतदारांनी केल्या. मत नोंदवता येत नसल्यामुळे मतदारांनी संताप व्यक्त केला. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच उमेदवारही घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी निवडणूक प्रशासनाच्या कारभारावर ताशेरे ओढले.
लोकशाहीच्या उत्सवात तांत्रिक बिघाडामुळे मतदारांचा वेळ वाया जाणे दुर्दैवी आहे. आम्ही प्रशासनाकडे तातडीने यंत्र बदलण्याची मागणी केली आहे,अशी संतप्त प्रतिक्रिया उमेदवारांकडून देण्यात आली.
गोंधळ वाढल्याचे पाहून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तत्काळ हस्तक्षेप करत मतदान प्रक्रिया तात्पुरती स्थगित केली आहे. बिघडलेले मशीन बदलण्याची मागणी लावून धरण्यात आली असून, नवीन मशीन आल्याशिवाय मतदान सुरू करू नये, असा पवित्रा उमेदवारांनी घेतला आहे.
सध्या घटनास्थळी पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या तांत्रिक बिघाडामुळे मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होणार का? आणि हा खोळंबा कोणाच्या पथ्यावर पडणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.