फलटण (प्रतिनिधी): फलटण तालुक्यात गुन्हेगारांचे धाडस दिवसागणिक वाढत चालले असून, आता चक्क घरात शिरून घरमालकालाच जीवे मारण्याची धमकी देण्यापर्यंत चोरट्यांची मजल गेली आहे. पिंपरद (ता. फलटण) येथे मध्यरात्री चार अज्ञात चोरट्यांनी घरफोडीचा धाडसी प्रयत्न केला. मात्र, घरमालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी चोरी टळली असली तरी, पकडलेल्या चोरट्याने घरमालकाला दिलेल्या धमकीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरद येथील रहिवासी आणि व्यावसायिक विक्रम दत्तात्रय टेंम्बरे (वय ३६) हे आपल्या कुटुंबासह राहत्या घरी झोपलेले असताना, दि. १२ एप्रिल २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास चार अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराला लक्ष्य केले. चोरट्यांनी घराच्या मागील बाजूने प्रवेश करून दरवाजाचा कोयंडा तोडला आणि लोखंडी रेलिंग वाकवून आत प्रवेश मिळवला.
घरात घुसल्यानंतर चोरट्यांनी थेट बेडरूममधील गोदरेज कपाट आणि तिजोरीकडे मोर्चा वळवला. सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास करण्याच्या तयारीत चोरटे असतानाच, आवाजामुळे विक्रम टेंम्बरे यांना जाग आली. समोर चोरटे दिसताच घाबरून न जाता टेंम्बरे यांनी धाडस दाखवून चोरट्यांना अडवण्याचा प्रयत्न केला.
विक्रम टेंम्बरे यांनी एका चोरट्याला घट्ट पकडून ठेवले. यावेळी स्वत:ला सोडवून घेण्यासाठी चोरट्याने टेंम्बरे यांच्याशी जोरदार झटापट केली. पकडलेल्या चोरट्याने आक्रमक होत, “मला सोड, नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही!” अशी थेट धमकी दिली. चोरट्याचा पवित्रा पाहून आणि इतर तीन साथीदार मदतीला धावून आल्याचे पाहून झटापटीत चोरट्याने हिसका मारला आणि चौघेही अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.
या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच फलटण ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणी विक्रम टेंम्बरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. १९५/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३३१, ३५१(४) व इतर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपरद आणि आसपासच्या परिसरात या घटनेमुळे घबराट पसरली असून, पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. फरार चोरट्यांच्या शोधासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असून, लवकरच आरोपींना बेड्या ठोकल्या जातील असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.