फलटण: तालुक्यातील फलटण-लोणंद या वर्दळीच्या मार्गावर काळज गावच्या हद्दीत अपघातांचे सत्र सुरूच असून, गेल्या २४ तासांत झालेल्या दोन भीषण अपघातांमध्ये एका शेतकरी दाम्पत्यासह एका पादचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनांमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
रविवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास काळज येथील बाळू तुकाराम गाढवे (वय ५५) आणि त्यांच्या पत्नी पुष्पा बाळू गाढवे (वय ५०) हे दोघे आपल्या दुचाकीवरून (क्र. MH 11 CM 7268) शेताकडे निघाले होते. जुना डोंबाळवाडी फाटा येथे वळण घेत असताना, पाठीमागून येणाऱ्या भरधाव कारने (क्र. MH 11 DU 9128) त्यांच्या दुचाकीला भीषण धडक दिली.
शनिवारी सायंकाळी ७:३० च्या सुमारास काळज येथील श्रीनाथ ॲकॅडमीसमोर दुसरी घटना घडली. आप्पा तात्या येळे (वय ६२, रा. डोंबाळवाडी) हे लोणंद-फलटण मार्ग ओलांडत असताना लोणंदकडून फलटणकडे जाणाऱ्या एका कारने (क्र. MH 12 SE 7986) त्यांना जोराची धडक दिली.
एकाच हद्दीत दोन दिवसांत तीन व्यक्तींना आपला जीव गमवावा लागल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. फलटण-लोणंद मार्गावर वाहनांचा वेग अनियंत्रित झाला असून, लोणंद पोलिसांनी अशा बेजबाबदार वाहनचालकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
महत्वाची टीप: दोन्ही घटनांचा पुढील तपास लोणंद पोलीस करत आहेत. दोन्ही प्रकरणांत कार चालकांच्या वेगावर आणि निष्काळजीपणावर फिर्यादीत बोट ठेवण्यात आले आहे.