फलटण (प्रतिनिधी): शहरातील कसबा पेठ परिसरातून दुचाकी चोरी करणाऱ्या दोन सराईत आरोपींना जेरबंद करण्यात फलटण शहर पोलिसांना यश आले आहे. आरोपींकडून चोरीची होंडा ॲक्टिव्हा स्कुटी आणि गुन्ह्यात वापरलेली विना नंबरची स्प्लेंडर मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी भारत काशिनाथ डोंबे (वय ५५, रा. गणेश अपार्टमेंट, कसबा पेठ, फलटण) यांनी आपली ४५,०००/- रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची होंडा ॲक्टिव्हा स्कुटी (क्र. MH.11.DJ 4487) राहत्या घरासमोर पार्क केली होती. दिनांक २६ मार्च २०२६ च्या रात्री ११:३० ते २७ मार्चच्या सकाळी ७:०० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी ही स्कुटी लंपास केली होती. याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात बीएनएस कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा गांभीर्याने तपास करण्यासाठी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विशाल खांबे यांनी तपासाचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. अरविंद काळे व गुन्हे प्रकटीकरण शाखेने (DB) तपासाची चक्रे फिरवली.
पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सापळा रचून दोन संशयितांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे खालीलप्रमाणे आहेत:
१) यश संदीप ढालपे (वय २३ वर्षे, रा. शिवाजीनगर, फलटण).
२) प्रफुल्ल चंद्रकांत हरीहर (वय २६ वर्षे, रा. मंगळवार पेठ, फलटण).
पोलिसांनी या दोघांची कौशल्यपूर्ण तपासणी केली असता, त्यांनी सदर स्कुटी चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीची ॲक्टिव्हा आणि गुन्ह्यासाठी वापरलेली विना नंबरची स्प्लेंडर जप्त करण्यात आली आहे. न्यायालयाने दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी सुनावली असून, या गुन्ह्याचा अधिक तपास महिला पोलीस हवालदार राणी फाळके करत आहेत.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण शहरचे पोलीस निरीक्षक अरविंद काळे, पोहवा संतोष नाळे, मुकेश घोरपडे, अतुल बडे आणि मपोहवा राणी फाळके यांनी केली आहे.