फलटण : टाळ्यांचा कडकडाट, 'वन्स मोअर'चा गजर आणि शास्त्रीय ते लोकसंगीताच्या सुरावटींनी फलटणची सायंकाळ मंत्रमुग्ध झाली. निमित्त होते, कला प्रसारक मंडळ आणि गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स आयोजित 'फलटण संस्थान हेरिटेज संगीत महोत्सवा'चे. या महोत्सवाच्या पाचव्या वर्षी फलटणसह बारामती आणि साखरवाडी येथील रसिकांनी विक्रमी गर्दी करत महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
दिग्गजांच्या उपस्थितीत दिमाखदार उद्घाटन
मुधोजी हायस्कूलच्या रंगमंचावर १७ व १८ एप्रिल रोजी हा सोहळा पार पडला. सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी फलटण एज्युकेशन सोसायटीचे भोजराज नाईक निंबाळकर, प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम, गोविंदचे कार्यकारी संचालक भल्ला यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
पहिला दिवस: सनईचे सूर अन् भारुडाची मोहिनी
महोत्सवाची सुरुवात आंतरराष्ट्रीय सनई वादक केदार जाधव यांच्या सुरेल सनई वादनाने आणि भजन सादरीकरणाने झाली. त्यानंतर प्रियांका चौधरी-ढेरंगे यांनी 'रामकृष्ण हरी' गजराने वातावरण भक्तीमय केले. त्यांनी सादर केलेल्या 'दत्त दर्शनाला जायचं' आणि 'अहंम वाघ्या सोहंम वाघ्या' या भारुडांना प्रेक्षकांनी मोठी दाद दिली.
रिॲलिटी शो फेम रसिका वैशंपायन यांनी भूप रागातील विलंबित ख्याल आणि 'अबीर गुलाल' हा अभंग सादर करून शास्त्रीय संगीताची बैठक सजवली. तसेच कृष्णा भोईटे यांनी पखवाजावर सादर केलेल्या 'लक्ष्मीपुरण' या सादरीकरणाला रसिकांनी वन्स मोअर देऊन डोक्यावर घेतले.
दुसरा दिवस: वाद्यांची जुगलबंदी आणि कथकचा नजाकत
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी नंदिता आणि निवेदिता देशपांडे या भगिनींनी सादर केलेल्या कथक नृत्याने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. त्यानंतर जगप्रसिद्ध हार्मोनियम वादक आदित्य ओक आणि सिंथेसायझर वादक सत्यजीत प्रभू यांच्या 'जादूई बोटांनी' महोत्सवाचा समारोप झाला. त्यांनी शास्त्रीय, उपशास्त्रीय ते चक्क पाश्चात्य संगीताचा प्रवास उलगडला. वाद्यांच्या इतिहासावरील त्यांच्या गप्पांनी रसिकांच्या ज्ञानात मोलाची भर घातली.
साखरवाडी व बारामतीकरांची विशेष उपस्थिती
या महोत्सवासाठी साखरवाडी येथील रसिकांकरिता फलटण एज्युकेशन सोसायटीने मोफत बस सेवा उपलब्ध करून दिली होती. यामुळे ग्रामीण भागातील रसिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. वारीच्या परंपरेतील अभंग आणि भारुडांमुळे वारकरी संप्रदायही या महोत्सवाशी मोठ्या प्रमाणावर जोडला गेल्याचे दिसून आले.
"अत्यंत महागड्या तिकीट दरात मिळणारे असे दर्जेदार कार्यक्रम फलटणकरांसाठी विनामूल्य उपलब्ध करून दिल्याबद्दल 'गोविंद' व्यवस्थापन आणि संयोजकांचे आभार मानले जात आहेत."
कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन आकाशवाणीचे निवेदक संजय भुजबळ यांनी केले. या महोत्सवासाठी भाग्यश्री गोसावी, गोविंद मिल्कचे पथक आणि फलटण एज्युकेशन सोसायटीच्या टीमने विशेष परिश्रम घेतले. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी पुढच्या महोत्सवाचे निमंत्रण देत या स्वरमैफलीचा समारोप केला.