फलटण: प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या व कृषि महाविद्यालय, फलटण येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून शिवरायांना आगळीवेगळी मानवंदना दिली. 'श्री शिवतीर्थ' फलटण यांच्या वतीने अनंत मंगल कार्यालय येथे या भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
५० विद्यार्थ्यांचा स्वेच्छेने सहभाग
या शिबिरात महाविद्यालयातील एकूण ५० स्वयंसेवकांनी स्वेच्छेने रक्तदान केले. "रक्तदान हेच श्रेष्ठ दान" हा मंत्र जपत, सामाजिक जबाबदारीच्या जाणिवेने विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाजसेवेच्या विचारांतून प्रेरणा घेऊन युवकांनी घेतलेल्या या पुढाकाराचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मान्यवरांचे मार्गदर्शन व नियोजन
या उपक्रमासाठी श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर आणि कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण यांनी विशेष मार्गदर्शन केले. शिबिराचे यशस्वी नियोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. पी. तरटे व प्रा. एम. एस. बिचुकले यांनी केले.
रक्तदात्यांचा गौरव
शिबिरात सहभागी झालेल्या प्रत्येक रक्तदात्याला प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. वैद्यकीय पथकाने सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेत हे शिबिर संपन्न केले.
"अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव अधिक दृढ होत आहे. भविष्यातही अशा सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेण्याचा निर्धार आमच्या स्वयंसेवकांनी केला आहे."
— NSS विभाग, फलटण महाविद्यालय.
(शब्दांकन: डॉ. जी. बी. अडसूळ, कृषि विस्तार विभाग)