फलटण (प्रतिनिधी): ढवळ पाटी येथे एका १८ वर्षीय युवकाची मोबाईल चॅटिंगच्या रागातून झालेल्या निर्घृण हत्येप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील चार संशयित आरोपींपैकी तिघांना पोलिसांनी विविध ठिकाणांहून शिताफीने ताब्यात घेऊन अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून उर्वरित आरोपीचा शोध पोलीस युद्धपातळीवर घेत आहेत.
दिनांक १० एप्रिल २०२६ रोजी मध्यरात्री १:२० वाजेच्या सुमारास ढवळ पाटी येथील मिऱ्याचीवाडी कमानीजवळ ही धक्कादायक घटना घडली होती. सोमनाथ संदीप जाधव (वय १८, रा. दालवडी) हा एका अल्पवयीन मुलीशी सोशल मीडियाच्या माध्यमातून चॅटिंग करत असल्याचा राग मनात धरून आरोपींनी त्याला गाठले. त्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण करण्यात आली आणि उचलून डांबरी रस्त्यावर आपटून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली होती.
गुन्हा दाखल होताच सर्व आरोपी फरार झाले होते. मात्र, फलटण ग्रामीण पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेऊन खालील आरोपींना अटक केली आहे:
१. आदित्य विजय शिंदे (वय २३, रा. ढवळ): याला ११ एप्रिल रोजीच अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला १६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
२. तेजस ऊर्फ चिक्या शिवाजी लोखंडे (वय २४, रा. ढवळ): याला १३ एप्रिल रोजी अटक करण्यात आली.
३. प्रद्युम्न ऊर्फ पिंट्या पांडुरंग लोखंडे (वय २२, रा. ढवळ): यालाही १३ एप्रिल रोजी अटक करण्यात आली असून आज (१४ एप्रिल) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांच्या नेतृत्वाखालील पथकात गुन्हे प्रकटीकरण विभागाचे उपनिरीक्षक दिपक पवार, ज्योती चव्हाण आणि अंमलदार नितीन चतुरे, अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, वैभव सुर्यवंशी, तुषार नलवडे, हणमंत दडस व शिवराज जाधव यांचा समावेश होता.
या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट असून, आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिक करत आहेत. पोलीस उर्वरित संशयित आरोपीचा शोध घेत असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.