फलटण: फलटण ग्रामीण पोलिसांच्या सतर्कतेमुळे कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या १६ मुक्या जनावरांना जीवदान मिळाले आहे. विडणी (ता. फलटण) गावच्या हद्दीत मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांनी सापळा रचून १२ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या धडक कारवाईमुळे पशूतस्करांचे धाबे दणाणले आहेत.
पोलीस निरीक्षक जगताप यांना एका आयशर टेम्पोतून (KA 27 C 1343) जनावरांना अत्यंत क्रूरपणे डांबून पंढरपूरकडे नेले जात असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे रात्रगस्तीवर असलेल्या पोलीस पथकाने गोरक्षक शरद गाडे यांच्या मदतीने विडणी परिसरात नाकाबंदी केली.
१४ मार्च रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास संशयित टेम्पो येताना दिसला. पोलिसांची चाहूल लागताच चालकाने टेम्पो रस्त्याच्या कडेला उभा केला आणि अंधाराचा फायदा घेत शेतातून पळ काढला. पोलिसांनी पाठलाग केला, मात्र तो हाती लागला नाही.
टेम्पोची झडती घेतली असता, आतमध्ये देशी व जर्शी गाई, बैल, कालवड आणि खोंड अशा एकूण १६ जनावरांना दाटीवाटीने कोंबल्याचे आढळून आले. त्यांच्यासाठी चारा किंवा पाण्याची कोणतीही सोय नव्हती. या सर्व जनावरांची किंमत २ लाख १५ हजार रुपये असून १० लाखांच्या टेम्पोसह पोलिसांनी एकूण १२ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नागरिकांचे समाधान: ग्रामीण भागात छुप्या पद्धतीने होणाऱ्या या अवैध वाहतुकीवर पोलिसांनी मिळवलेल्या यशामुळे गोप्रेमींमधून समाधान व्यक्त होत आहे.