फलटण (प्रतिनिधी): एका मुलीसोबत मोबाईलवर चॅटिंग केल्याच्या रागातून १८ वर्षीय तरुणाची लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना फलटण तालुक्यातील ढवळ पाटी येथे घडली आहे. या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे संपूर्ण सातारा जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
सोमनाथ संदीप जाधव (वय १८, रा. मिऱ्याचीवाडी, दालवडी, ता. फलटण) असे या घटनेत मृत्यू झालेल्या दुर्दैवी युवकाचे नाव आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आणि दाखल फिर्यादीनुसार, मृत सोमनाथ हा दि. 9 एप्रिल २०२६ च्या रात्री आपल्या घराबाहेर झोपला होता. रात्री १:१५ वाजेच्या सुमारास सोमनाथच्या वडिलांच्या मोबाईलवर सोमनाथच्याच नंबरवरून फोन आला आणि त्यांना तातडीने ढवळ पाटी येथे बोलावून घेण्यात आले. वडील तिथे पोहोचले असता, आरोपींनी त्यांना सांगितले की, सोमनाथ हा ढवळ येथील नरसिंग शिंदे यांच्या मुलीशी मोबाईलवरून चॅटिंग करत आहे. याच कारणावरून आरोपींनी सोमनाथला संपवण्याची धमकी दिली.
आरोपींनी सोमनाथला जीवे मारण्याच्या उद्देशाने लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. जीव वाचवण्यासाठी सोमनाथ ढवळ पाटीवरील बाजार समितीच्या कार्यालयाजवळील पटांगणात पळाला, मात्र आरोपींनी त्याचा पाठलाग करून त्याला तिथे गाठले. तिथे त्याला पुन्हा अमानुषपणे मारहाण करून डांबरी रस्त्यावर जोराने आपटले, ज्यामध्ये सोमनाथचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या प्रकरणी मृत सोमनाथचे वडील संदीप उमाजी जाधव (वय ४२, रा. मिऱ्याचीवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात आदित्य विजय शिंदे, ओम लोखंडे, चिक्या लोखंडे आणि पिंटू लोखंडे (सर्व रा. ढवळ, ता. फलटण) या चार जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३ (१) आणि ३ (५) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विशाल खांबे यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे. पोलीस निरीक्षक श्री. संदीप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी तजवीज ठेवली आहे. एका १८ वर्षीय कोवळ्या तरुणाचा अशा प्रकारे अमानुष अंत झाल्याने दालवडी आणि परिसरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.