फलटण (प्रतिनिधी): फलटण-दहिवडी मार्गावर रस्ते विकास की मृत्यूचा सापळा? असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. या मार्गावर केवळ २४ तासांच्या अंतराने दोन मोठे अपघात घडले असून, दोन्ही घटनांमध्ये १२ टायरी अवजड डंपर रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे पलटी झाले आहेत. रविवारी झिरपवाडी येथे झालेला अपघात ताजा असतानाच, आज सोमवारी सकाळी दुधेबावी येथे दुसरा डंपर पलटी झाल्याने खळबळ उडाली आहे.
आज सोमवार, दिनांक ६ एप्रिल रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास फलटण तालुक्यातील दुधेबावी येथील भिसे वस्तीनजीक दुसरा अपघात घडला. एक १२ टायरी डंपर जात असताना समोरून आलेल्या वाहनाला जागा देण्यासाठी चालकाने डंपर रस्त्याच्या कडेला घेतला. मात्र, रस्त्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी भराव कच्चा असल्याने रस्ता अचानक खचला आणि डंपर जागीच पलटी झाला.
काल रविवारी (५ एप्रिल) झिरपवाडी येथे अशाच प्रकारची घटना घडली होती. तिथे रस्त्याच्या कडेला असलेला ड्रेनेजचा स्लॅब खचल्याने प्लास्टर सेंडने भरलेला डंपर उलटला होता. सलग दोन दिवस झालेल्या या अपघातांनी रस्ते बांधणीच्या दर्जाचे अक्षरशः वाभाडे काढले आहेत.
हे दोन्ही अपघात चालकांच्या चुकीमुळे नसून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित ठेकेदाराच्या बोगस कामामुळे झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.
सलग दोन डंपर पलटी होऊन मालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने दोन्ही घटनांत जीवितहानी झाली नाही, मात्र एखादी छोटी गाडी किंवा दुचाकी या डंपरखाली आली असती तर मोठा अनर्थ घडला असता. "या निकृष्ट कामामुळे अजून किती अपघात पाहायचे?" असा सवाल स्थानिक ग्रामस्थ विचारत आहेत.
पुढील इशारा:
जर या रस्त्याचे काम तातडीने दर्जेदार पद्धतीने सुधारले नाही, तर भविष्यात होणाऱ्या जीवितहानीला सर्वस्वी प्रशासन आणि ठेकेदार जबाबदार असतील. या निकृष्ट कामाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.