फलटण (प्रतिनिधी):शहरातील 'एच. डी. लाटकर (एचपी गॅस एजन्सी)' यांच्या बेजबाबदार आणि नियोजनशून्य कारभारामुळे गोखळी (ता. फलटण) येथील गॅस ग्राहक सध्या मोठ्या संकटात सापडले आहेत. गेल्या २० ते २५ दिवसांपासून गावात गॅस सिलेंडरचा पुरवठाच करण्यात आलेला नसल्याने महिलांना पुन्हा एकदा चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. वारंवार पाठपुरावा करूनही एजन्सीकडून केवळ उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मौजे गोखळी येथील शेकडो ग्राहकांनी एच. डी. लाटकर गॅस एजन्सीकडून कनेक्शन घेतलेले आहे. नियमानुसार ठराविक दिवसांच्या अंतराने गॅसची गाडी गावात येणे अपेक्षित असताना, गेल्या पाऊण महिन्यापासून एकही गाडी गावात फिरकलेली नाही. अनेक ग्राहकांनी गॅस बुक करूनही त्यांना सिलेंडर मिळालेले नाहीत.
गावात गाडी येत नसल्याने अनेक ग्राहकांनी स्वतःचे वाहन करून फलटण येथील एजन्सीचे कार्यालय गाठले. मात्र, तिथे गेल्यावरही 'स्टॉक नाही' किंवा 'गाडी येईल' अशी थातुरमातूर उत्तरे देऊन ग्राहकांना रिकाम्या हाताने परत पाठवले जात आहे. भर उन्हात लांबून येणाऱ्या ग्राहकांची ही थट्टाच असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
एजन्सीच्या फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास फोन उचलला जात नाही. प्रत्यक्ष भेट दिल्यास समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत. आश्चर्याची बाब म्हणजे, या संदर्भात संबंधित पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधूनही त्यांनी या गंभीर प्रश्नाकडे सपशेल दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. एजन्सीच्या या मनमानी कारभारामुळे महिलांची मोठी गैरसोय होत असून स्वयंपाकासाठी इंधन नसल्याने घरगुती बजेट आणि वेळ दोन्ही कोलमडले आहे.
एजन्सीच्या या 'भोंगळ' कारभाराचा फटका केवळ एका गावाला नसून अनेक ग्राहकांना बसत आहे. "आम्ही पैसे भरूनही आम्हाला वेळेवर सेवा का मिळत नाही?" असा संतप्त सवाल गोखळीतील नागरिक विचारत आहेत. जर येत्या दोन दिवसांत गॅस पुरवठा सुरळीत झाला नाही, तर एच. डी. लाटकर गॅस एजन्सीच्या कार्यालयावर धडक मोर्चा नेऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा गोखळी ग्रामस्थांनी दिला आहे.