सातारा:सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या रणधुमाळीचा निकाल अखेर जाहीर झाला असून, जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. जिल्हा परिषदेच्या ६५ जागांसाठी झालेल्या या अटीतटीच्या लढतीत कोणत्याही एका पक्षाला ३३ हा बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. त्यामुळे साताऱ्याच्या सत्तेचा पेच आता 'मातोश्री'वरून की 'सागर' बंगल्यावरून सुटणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
लोकसभा निवडणुकीपासून विजयाचा वारू उधळलेल्या भारतीय जनता पक्षाने जिल्हा परिषदेवर आपला झेंडा फडकवण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावली होती. दोन मंत्री आणि दोन आमदारांनी प्रतिष्ठा पणाला लावूनही भाजपला २७ जागांवर समाधान मानावे लागले आहे. जरी भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी सत्तेसाठी त्यांना अजूनही ६ सदस्यांची गरज आहे.
या निवडणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मारलेली मुसंडी. जिल्ह्यात कधी नव्हे ते शिवसेनेने १५ जागा जिंकून सर्वांना धक्का दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला २० जागा मिळाल्या असून, त्यांना सत्तेत येण्यासाठी आता शिंदेंच्या शिवसेनेची साथ अनिवार्य आहे. मात्र, राज्यातील सत्तेचे समीकरण पाहता शिवसेना कोणाच्या बाजूने उभी राहणार, यावरच जिल्ह्याचा 'मिस्टर जिल्हाध्यक्ष' ठरणार आहे.
निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन हा पक्षासाठी मोठा धक्का ठरला. मागील निवडणुकीत ४१ जागांसह एकहाती सत्ता मिळवणाऱ्या राष्ट्रवादीला यावेळेस सहानुभूतीची लाट असूनही केवळ निम्म्याच म्हणजे २० जागांवर समाधान मानावे लागले आहे. फलटणमध्ये मात्र माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी शिवसेनेच्या मदतीने आपला गड राखण्यात यश मिळवले आहे.
जिल्ह्यातील ११ पंचायत समित्यांपैकी सातारा आणि खटावमध्ये भाजपने विजयाचा गुलाल उधळला आहे. तर वाई, खंडाळा आणि कोरेगावमध्ये राष्ट्रवादीने वर्चस्व राखले आहे. शिवसेनेने पाटणमध्ये आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. मात्र, जावळी, माण, महाबळेश्वर आणि फलटण या चार पंचायत समित्यांमध्ये बलाबल समान झाल्यामुळे आता सत्तेचा कौल 'चिठ्ठी'द्वारे ठरणार आहे.
जिल्हा परिषदेत भाजपला २७, राष्ट्रवादीला २०, तर शिंदेंच्या शिवसेनेला १५ जागा मिळाल्या आहेत. काँग्रेस, स्वाभिमानी आणि अपक्षाला प्रत्येकी १ जागा मिळाली आहे. आता जिल्ह्याच्या राजकारणात 'गिरे तो भी टांग उपर' अशी स्थिती असून, सत्तेच्या चाव्या खऱ्या अर्थाने शिंदेंच्या शिवसेनेकडेच राहिल्या आहेत.