राज्यात सत्तांतर होताच राष्ट्रवादीने सातारा, सोलापूर जिल्ह्याच्या हक्काचे पाणी बारामती-इंदापूरला वळवल्यामुळे फलटण तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील शेतकर्यांच्यावतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात येणार आहे.
सातारा : राज्यात सत्तांतर होताच राष्ट्रवादीने सातारा, सोलापूर जिल्ह्याच्या हक्काचे पाणी बारामती-इंदापूरला वळवल्यामुळे फलटण तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील शेतकर्यांच्यावतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात येणार असून त्यासाठी उद्या दि. 22 रोजी सकाळी दहा वाजता फलटण येथील नाना पाटील चौकात हजर राहण्याचे आवाहन निरा-देवघर पाणी संघर्ष समितीच्यावतीने ऍड नरसिंह निकम यांनी केले आहे.
गेली तीन दशकाहून अधिक काळ खंडाळा-फलटणसह सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, सांगोला, पंढरपूर तालुक्यातील जनतेने निरा-देवघरच्या पाण्यासाठी संघर्ष केलेला होता. राज्यात भाजपचे सरकार असताना निरा-देवघरचे 45 टक्के पाणी निरा डाव्या कालव्यासाठी, तर 55 टक्के पाणी निरा उजव्या कालव्यासाठी असा आदेश करुन भाजप सरकारने खर्या अर्थाने न्यायनिवाडा केला होता. यासाठी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी विशेष प्रयत्न केले होते. निरा-देवघरचे हक्काचे पाणी खंडाळा, फलटणसह सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, सांगोला, पंढरपूर तालुक्यातील शिवारांमध्ये खळखळत असतानाच सुमारे तीन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीने डाव साधत पुन्हा जुना फॉर्म्युला उकरुन काढत निरा डाव्या कालव्यात 55 टक्के, तर उजव्या कालव्यात 45 टक्के असा आदेश काढण्यात आल्यामुळे दुष्काळी पट्ट्यातील सुमारे 10 लाख शेतकर्यांवर राष्ट्रवादीने अन्याय केलेला आहे. याच्या विरोधात सातारा-सोलापूरमधील दुष्काळी पट्ट्यातील जनता एकवटली असून उद्या दि. 22 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यासाठी व पुढील रणनिती आखण्यासाठी फलटण येथील नाना पाटील चौकात सर्वपक्षीय, सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी हजर राहण्याचे आवाहन निरा-देवघर पाणी संघर्ष समितीच्यावतीने ऍड नरसिंह निकम यांनी केले आहे.
निरा-देवघर पाणी वाटपाबाबत सभापती मिस्टर रामराजेंची चुप्पी!
निरा-देवघर व गुंजवणी धरणाचे 55 टक्के पाणी पुन्हा निरा डाव्या कालव्यात सोडण्यात येणार असल्यामुळे खंडाळा, फलटण व सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांमध्ये प्रक्षुब्धतेचे वातावरण निर्माण झाले असतानाच याप्रश्नी प्रसंगी न्यायालयात जाण्याचा तसेच तीव्र स्वरुपात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचा हा निर्णय जिल्ह्यातील खंडाळा, फलटण तालुक्याला बाधक असताना फलटण तालुक्याचे भगीरथ समजणार्या विधान परिषद सभापती मिस्टर रामराजे नाईक-निंबाळकर यांनी मात्र निरा-देवघर, गुंजवणी पाणी वाटपाबाबत चुप्पी साधल्यामुळे फलटण तालुक्यासह जिल्ह्यात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.