नॅक 'A' ग्रेड व NBA नंतर यशाचे नवे शिखर; ग्रामीण तंत्रशिक्षणाला मिळणार जागतिक ओळख
फलटण : प्रतिनिधी
ग्रामीण भागातील तंत्रशिक्षणाचा दर्जा उंचावणाऱ्या फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयाने शैक्षणिक क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (UGC) महाविद्यालयाला स्वायत्त संस्था (Autonomous Status) दर्जा बहाल करण्यात आला आहे. नॅक 'A' ग्रेड आणि NBA मान्यतेनंतर मिळालेला हा दर्जा संस्थेच्या प्रगतीतील मैलाचा दगड ठरला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी सोसायटी नियामक मंडळाचे सदस्य भोजराज नाईक निंबाळकर, हेमंत रानडे, शिरीष दोशी, डॉ. पुरुषोत्तम राजवैद्य, शरदराव रणवरे, प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोज कुमार दळवी आणि प्रा. शांताराम काळेल उपस्थित होते.
स्वायत्ततेचे फायदे आणि नवीन अभ्यासक्रम
आ. रामराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले की, स्वायत्ततेमुळे महाविद्यालयाला आता स्वतःचे अभ्यासक्रम तयार करणे आणि परीक्षा पद्धतीत आधुनिक सुधारणा करणे शक्य होईल. यामुळे विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंट संधीत मोठी वाढ होईल.
आगामी शैक्षणिक वर्षापासून (२०२६-२७) सुरू होणारे नवीन कोर्स:
डिप्लोमा स्तर: एआय (AI) अँड डेटा सायन्स, एआय अँड मशीन लर्निंग (ML).
पदवी स्तर: आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग (नवीन कोर्स) आणि एआय अँड डेटा सायन्स (वाढीव तुकडी).
या अभ्यासक्रमांसाठी BATU, MSBTE आणि AICTE कडून आवश्यक सर्व मान्यता व 'एनओसी' प्राप्त झाल्या आहेत.
अत्याधुनिक पायाभूत सुविधा
महाविद्यालयाने नव्याने उभारलेल्या प्रशस्त इमारतीत हाय-स्पीड इंटरनेट, सुसज्ज संगणक प्रयोगशाळा, आधुनिक सेमिनार हॉल्स आणि समृद्ध ग्रंथालय उपलब्ध आहे. AICTE च्या तज्ज्ञ समितीने (EVC) या सुविधांची पाहणी करून समाधान व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे, चालू शैक्षणिक वर्षाचे सर्व प्रवेश आता 'ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट' म्हणूनच केले जाणार असल्याचे प्राचार्य डॉ. मनोज कुमार दळवी यांनी स्पष्ट केले.
यशाचे शिल्पकार
स्वायत्तता मिळवण्यासाठी प्राचार्य डॉ. मनोजकुमार दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयक प्रा. शांताराम काळेल, प्रा. दिपाली जाधव, डॉ. दत्तात्रय शिंदे, प्रा. किशोरी कुमठेकर आणि प्रा. तेजश्री जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.
या यशाबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, महाविद्यालय समितीचे चेअरमन युवराज ॲड. श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर व सर्व सदस्यांनी महाविद्यालयाच्या टीमचे कौतुक केले आहे.
"स्वायत्ततेमुळे उद्योगांच्या बदलत्या गरजांनुसार आम्ही आमचा अभ्यासक्रम अद्ययावत ठेवू शकू. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या कंपन्यांमध्ये नोकरी मिळवणे अधिक सुलभ होणार आहे." > — आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर