फलटण (प्रतिनिधी): पाडेगाव (ता. फलटण) येथे पाडेगाव सामाजिक विकास फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पाचव्या वर्षाच्या ‘महापुरुष जयंती महोत्सवाचा’ काल, शनिवार दिनांक ११ एप्रिल २०२६ रोजी अत्यंत उत्साहात आणि मंगलमय वातावरणात शुभारंभ झाला. या सोहळ्याचे औचित्य साधून फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दीपकराव चव्हाण यांनी महोत्सवाला भेट देऊन सर्व महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८ वाजता उत्साही वातावरणात झाली. यावेळी शास्त्रोक्त पद्धतीने दिपप्रज्वलन करण्यात आले आणि त्यानंतर गावातून भव्य ग्रंथदिंडी काढण्यात आली. "चला समाज घडवूया" हा संदेश देत सामाजिक ऐक्याचा जागर या दिंडीच्या माध्यमातून करण्यात आला.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी सायंकाळी ८ वाजता प्रबोधनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ साहित्यिक आणि प्रबोधनकार प्रा. श्री. रवींद्र कोकरे साहेब यांनी "पुण्यश्लोक अहिल्यामाता ते क्रांतिज्योती सावित्रीमाता क्रांतीपर्व" या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. महापुरुषांच्या विचारांची आजच्या काळात असलेली गरज आणि स्त्री शक्तीचा गौरवशाली इतिहास त्यांनी आपल्या ओघवत्या शैलीत मांडला.
यावेळी बोलताना माजी आमदार दीपकराव चव्हाण म्हणाले की,
"पाडेगाव सामाजिक विकास फाउंडेशनने राबवलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे. महापुरुषांचे विचार केवळ भाषणापुरते मर्यादित न ठेवता ते तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज आहे. अशा महोत्सवांतूनच नवीन पिढीला आपला देदीप्यमान इतिहास समजण्यास मदत होईल."
हा महोत्सव १५ एप्रिलपर्यंत चालणार असून पुढीलप्रमाणे कार्यक्रम संपन्न होणार आहेत:
या कार्यक्रमाला पाडेगाव परिसरातील ग्रामस्थ, फाउंडेशनचे पदाधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन पाडेगाव सामाजिक विकास फाउंडेशनच्या वतीने नेवसेवस्ती, पाडेगाव येथे करण्यात आले आहे.