फलटण (प्रतिनिधी):फलटण तालुक्यातील साखरवाडी येथे झालेल्या ऐतिहासिक सभेत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी वस्तुस्थिती मांडल्यानंतर, भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केलेली टीका आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. "मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला म्हणजे झाले," असा दावा करणाऱ्या माजी खासदारांनी, राज्याच्या घटनात्मक चौकटीत 'उद्योग मंत्रालय' आणि 'उद्योगमंत्री' या पदाचे अस्तित्वच नाकारले आहे का? असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे.
रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांचा एक जुना व्हिडिओ दाखवून सामंत यांच्या विधानाचे खंडन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रशासकीय वर्तुळात चर्चा अशी आहे की, एखाद्या सभेत दिलेले आश्वासन आणि प्रत्यक्ष सरकारी फाईलवर होणारी कार्यवाही यात जमीन-अस्मानाचा फरक असतो.
साखरवाडीच्या सभेत उदय सामंत यांनी नाईकबोमवाडी एमआयडीसीबाबत तांत्रिक आणि वस्तुनिष्ठ मुद्दे मांडले होते. मात्र, त्याला उत्तर देताना माजी खासदारांनी थेट उद्योगमंत्र्यांच्या अधिकारालाच आव्हान दिले. "मुख्यमंत्र्यांनी काय शब्द दिला हे सामंत यांनी मुख्यमंत्र्यांना खाजगीत विचारावे ," असे विधान करून निंबाळकर यांनी लोकशाहीतील पारदर्शक कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सरकार 'खाजगी शब्दावर' चालते की 'शासकीय नियमावलीवर', याचे उत्तर आता जनतेला हवे आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी मेगा प्रोजेक्टचे आश्वासन दिले असले, तरी त्याची अंमलबजावणी करणे हे उद्योग मंत्रालयाचे काम असते. उद्योगमंत्र्यांना अंधारात ठेवून किंवा त्यांना डावलून कोणताही मोठा प्रकल्प तांत्रिकदृष्ट्या मार्गी लागू शकत नाही. अशा परिस्थितीत, "मुख्यमंत्र्यांनी उद्योगमंत्र्यांना न विचारता शब्द दिला," असे म्हणणे म्हणजे खुद्द फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवर संशय घेण्यासारखे आहे.
राजकीय विश्लेषकांचे मत:
"राज्यात महायुतीचे सरकार असताना, घटक पक्षाच्या कॅबिनेट मंत्र्याबद्दल 'ज्युनिअर' सारखे शब्द वापरणे हे राजकीय पोरकटपणाचे लक्षण आहे. उद्योगांचे धोरण हे मंत्रालयात ठरते, सभेतल्या टाळ्यांवर नाही. सामंत यांनी मांडलेली भूमिका ही नियमाला धरून आहे, तर खासदारांची भूमिका ही केवळ राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी केलेली धडपड दिसते."
साखरवाडीच्या रणरणत्या उन्हात हजारो नागरिक राजे गटाच्या प्रेमापोटी जमले होते. तिथे उदय सामंत यांनी एमआयडीसीची 'पोलखोल' केल्यानंतर माजी खासदारांची झालेली चिडचिड बरेच काही सांगून जाते. मुख्यमंत्र्यांच्या शब्दाचा आदर नक्कीच आहे, पण त्या शब्दाला प्रत्यक्ष कृतीत उतरवणाऱ्या 'उद्योगमंत्र्यांचा' अनादर करणे फलटणच्या जनतेला रुचलेले नाही.