"नागरिकांची लूट थांबवा, २% दंड तात्काळ रद्द करा!" – प्रीतसिंह खानविलकर यांचा प्रशासनाला निर्वाणीचा इशारा
फलटण (प्रतिनिधी): एकीकडे खड्डेमय रस्ते, विस्कळीत पाणीपुरवठा आणि कचऱ्याचे ढीग अशा समस्यांनी फलटणकर त्रस्त असताना, आता नगरपरिषद प्रशासनाने करदात्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम सुरू केले आहे. मालमत्ता कराच्या चालू थकबाकीवर आकारला जाणारा २% अन्यायकारक दंड म्हणजे सर्वसामान्यांची सरळसरळ लूट असल्याची तोफ प्रीतसिंह अमरसिंह खानविलकर यांनी डागली आहे. या संदर्भात त्यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनानंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे.
नगरपरिषदेच्या नियमानुसार कराची पावती निघाल्यानंतर ९० दिवसांत कर न भरल्यास २% दंड आकारला जातो. मात्र, खानविलकर यांनी प्रशासनाचा बुरखा फाडताना गंभीर आरोप केला आहे. प्रत्यक्षात करदात्यांना या पावत्या वेळेवर मिळतच नाहीत. अनेकदा पावती तयार झाल्याच्या तारखेपासून २ ते ३ महिन्यांनी ती नागरिकांच्या हातात पडते.
"मुदत संपत आल्यावर पावती द्यायची आणि वरून दंड वसूल करायचा, हा कोणता न्याय? प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा दंड नागरिकांनी का सोसायचा?" असा जळजळीत सवाल प्रीतसिंह खानविलकर यांनी उपस्थित केला आहे.
शहरातील नागरी सुविधांची अवस्था बिकट असताना केवळ वसुलीसाठी कठोर होणाऱ्या प्रशासनावर खानविलकर यांनी कडक शब्दांत ताशेरे ओढले.
अशा मूलभूत सुविधा देण्यात सपशेल अपयशी ठरलेले प्रशासन दंडाचा बोजा टाकून नागरिकांचे कंबरडे मोडत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
प्रीतसिंह खानविलकर यांनी प्रशासनाला ठणकावून सांगितले आहे की, जोपर्यंत कर वितरण व्यवस्था सुधारत नाही आणि नागरिकांना वेळेवर पावत्या मिळत नाहीत, तोपर्यंत हा २% दंड आकारणे बेकायदेशीर आणि अनैतिक आहे. हा दंड तात्काळ रद्द न केल्यास फलटणकर रस्त्यावर उतरून प्रशासनाला जाब विचारतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.