फलटण: तालुक्यातील पूर्व भागात सध्या रब्बी हंगामातील पिकांची काढणी अंतिम टप्प्यात असतानाच निसर्गाने आपली वक्रदृष्टी फिरवली आहे. गेल्या दोन दिवसांपासून फलटण पूर्व भागातील तिरकवाडी, सोनवडी, दुधेबावी, वडले, नाईकबोमवाडी, मिरढे आणि आसपासच्या गावांमध्ये विजांच्या कडकडाटासह झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. हाता-तोंडाला आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्याने बळीराजा संकटात सापडला आहे.
शेतकऱ्यांनी गहू, हरभरा, कांदा आणि रब्बी ज्वारी यांसारखी पिके मोठ्या कष्टाने उभी केली होती. मात्र, ऐन काढणीच्या वेळी पाऊस आल्याने खळ्यावर जमा केलेले धान्य भिजले आहे.
केवळ रब्बी पिकेच नव्हे, तर फळबागांनाही या वादळाचा मोठा तडाखा बसला आहे. जोरदार वाऱ्यामुळे आंबा, डाळिंब आणि केळीच्या झाडांची मोडतोड झाली असून मोठ्या प्रमाणावर फळगळ झाली आहे. वर्षभर मेहनत करून जोपासलेल्या बागांचे डोळ्यादेखत नुकसान होताना पाहून बागायतदार हवालदिल झाले आहेत.
अवकाळीच्या तडाख्यानंतर कृषी विभाग सतर्क झाला असून नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे.
"फलटण तालुक्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे प्राथमिक अंदाजानुसार सुमारे ८० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ज्या ठिकाणी नुकसान झाले आहे, अशा शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधला असून पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे."
— दत्तात्रय गायकवाड (तालुका कृषी अधिकारी, फलटण)
आधीच खत, बियाणे आणि मजुरीच्या वाढत्या खर्चामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यातच या नैसर्गिक संकटामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सरकारने केवळ पंचनामे न करता तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी बाधित गावातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
बातमीचा गोषवारा: