फलटण (प्रतिनिधी):शहरातील शंकर मार्केट परिसरात रविवार, २२ फेब्रुवारी रोजी रात्री ९ च्या सुमारास अनिल विठ्ठल हिरणवाळे आणि संतोष हिरणवाळे या दोन भावांवर १० ते १२ जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्रांनी जो जीवघेणा हल्ला केला, त्या घटनेने संपूर्ण फलटण शहर संतापले आहे. या अमानुष कृत्याचा निषेध करण्यासाठी आज शहरातील विविध मंडळे आणि व्यापाऱ्यांनी एकत्र येत पोलीस स्टेशनवर मूक मोर्चा काढला आणि उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना जाहीर निवेदन दिले.
व्यापारी आणि कार्यकर्त्यांनी दिलेल्या निवेदनात स्पष्टपणे नमूद केले आहे की, हा हल्ला केवळ एका व्यक्तीवर नसून फलटणच्या कायदा व सुव्यवस्थेवर झालेला हल्ला आहे. निष्पाप गॅरेज व्यावसायिकांवर शस्त्राने वार करणाऱ्या त्या १०-१२ जणांच्या टोळीवर तात्काळ 'मोक्का' (संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा) अंतर्गत कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. जर तपासात दिरंगाई झाली किंवा आरोपींना पाठीशी घातले गेले, तर संपूर्ण 'फलटण बंद' ठेवून तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे.
शांतताप्रिय आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या फलटण शहरात उघड्यावर शस्त्रे घेऊन फिरणाऱ्या गुंडांमुळे पोलिसांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. जखमी हिरणवाळे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नाजूक असून, अशा गुंडांना वेळीच पायबंद घातला नाही तर भविष्यात कोणत्याही व्यापाऱ्याला सुरक्षितपणे व्यवसाय करणे कठीण होईल, अशी भीती निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.
या मूक मोर्चात आणि निवेदनात खालील मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला:
प्रशासकीय पाऊल:
पोलीस प्रशासनाकडून मुख्य सूत्रधारांसह सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. मात्र, जोपर्यंत कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत फलटणकरांमधील संताप शांत होण्याची चिन्हे दिसत नाहीत.