फलटण (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, कोल्हापूर विभागाचे अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांनी आज, सोमवार दिनांक २ मार्च रोजी फलटण तालुक्यातील विविध परीक्षा केंद्रांना अचानक भेटी देऊन पाहणी केली. बोर्डाची परीक्षा पारदर्शक आणि तणावमुक्त वातावरणात पार पडावी, यासाठी त्यांनी थेट मैदानात उतरून नियोजनाचा आढावा घेतला.
दुपारच्या सत्रात श्री. क्षीरसागर यांनी फलटणमधील नामांकित मुधोजी हायस्कूल येथील परीक्षा केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांनी प्रत्येक वर्गातील बैठक व्यवस्था, पिण्याचे पाणी आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांची बारकाईने पाहणी केली. परीक्षेचे वातावरण अतिशय शांत आणि शिस्तबद्ध असल्याचे पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.
भेटीदरम्यान पत्रकारांशी बोलताना श्री. राजेश क्षीरसागर यांनी स्पष्ट केले की, फलटण येथील बहुतांश परीक्षा केंद्रांवरील सर्व वर्गांमध्ये सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
"परीक्षा काळात कोणतीही गैरप्रकार होऊ नये, यासाठी आम्ही 'झिरो टॉलरन्स' धोरण स्वीकारले आहे. फलटणमधील केंद्रांवर सीसीटीव्हीचे जाळे असून, या सर्व फुटेजचे व्यवस्थित जतन करण्याच्या कडक सूचना आम्ही केंद्रप्रमुखांना दिल्या आहेत. परीक्षेच्या पारदर्शकतेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही," असे क्षीरसागर यांनी ठामपणे नमूद केले.
या भेटीवेळी त्यांच्यासोबत शिक्षण विभागातील अधिकारी, माधोजी हायस्कूलचे मुख्याध्यापक आणि परीक्षा केंद्राचे संबंधित कर्मचारी उपस्थित होते.